अक्षर आकार:

चर्पटपंजरी मराठी समवृत्त भावार्थ

Charpatapanjari Based Samavritta in narAThi

चर्पटपंजरी मराठी समवृत्त भावार्थ

(श्री आद्य शंकराचार्य यांच्या चर्पटपंजरीवर आधारित) रचना: श्री. मधुकर सोनवणे भज गोविंदा, भज गोविंदा, वेड्या भक्ति करी हरिची । येईल मृत्यू समोर तेंव्हां, व्यर्थचि रे पोपटपंची ॥ १॥ सोड तू वेड्या हांव धनाची, कांस धरी रे निजरूपाची । जेही लाभे प्राक्तन योगे, तृप्ती तेणे हो चित्ताची ॥ २॥ यौवन वैभव बघुनि नारीचे, मोहि गुंतशी कां वेड्या । रक्त मांस चरबीच्या नश्वर, अस्थींच्या देही काड्या ॥ ३॥ कमलदलीच्या जलबिन्दू सम, जीवन अवघे एक क्षणाचे । झुरे देह चिंता व्याधीने, तो तर भक्षची रे काळाचे ॥ ४॥ कमाविशी जोवरी तोवरी, तुझा कळवळा स्नेहिजना । पराधीन होता म्हातारा, कवडीचीही किंमत ना ॥ ५॥ जोवरी देही प्राणज्योति तंव, तोवरी पुसतील कुशल तुला । देह अयोध्या राम सोडिता, शिवे न भार्या प्रेताला ॥ ६॥ संपे खेळातची बालपण, अर्थ काम यौवनी तसे । करीत चिंता, वृद्ध जाहला, आठव हरिचा परी नसे ॥ ७॥ म्हणशी पत्नी, पुत्रही माझे, तुला न माहित तू कोणाचा । आला कोठूनि, कुठे चालला, शोध करि रे तू सत्याचा ॥ ८॥ सत्संगाने, निःसंगत्वाचा, लाभे त्यातुनी निर्मोहत्व । निर्मोहत्वे निश्चलतत्त्व नि, प्रतीत त्यातुनी ईश्वरतत्त्व ॥ ९॥ जर्जर देही कामवासना, सुकले जल जणु सरोवरी । कवडि न हाती, दूर आप्तजन, तत्त्वचि नेइल पैलतिरी ॥ १०॥ धन यौवन नि सगे सोबती, गर्व सोड हे क्षणीक सारे । माया बंधा तोडुनी मिळवी, सत्य असे जे कालातीत रे ॥ ११॥ दिवस रात्र नि सकाळ संध्या, शिशिर वसंतही पुनःपुन्हा । जीवन धावे काळासंगे, आशाबंधन सुटेचि ना ॥ १२॥ धन नि कांता नकोच चिंता, वेड्या कुणी ना मार्ग दाविला । घेई आसरा सत्पुरुषांचा, तरुनि जावया भव अब्धिला ॥ १३॥ जटाधारि कुणी चमनचकोटा, भगवे कुणी ते संन्यासी । पोटासाठी सोंगे नाना, परि न भजती गोविंदासी ॥ १४॥ जर्जर गात्रे, कंपित काया, केशकलाप न वय लपवी । मंद चाल ती टेकित काठी, आशा परि बांधुनि ठेवी ॥ १५॥ आग पोटीची, घड्याळ तैसे, अखंड धावत तुज ठेवी । चार घास नि झोप अपुरी, आशा बांधुनी तुज फिरवी ॥ १६॥ कुरुते गङ्गासागरगमनं व्रतपरिपालनमथवा दानम् । ज्ञानविहीनः सर्वमतेन मुक्तिं न भजति जन्मशतेन ॥ १७॥ मंदिरी वा तू वृक्षाखाली, निवास करि साध्या वस्त्राने । भू वरी शय्या, पूर्ण विरागी, नित्य राही तू संतोषाने ॥ १८॥ रमता योगी अथवा भोगी, कांही लाभे रिक्त हात वा । देह करि साऱ्या व्यापारा, स्वानंदाची कधि न वानवा ॥ १९॥ वाच जरा तू भगवद्गीता, प्राशी गंगाजला जरा । चरण आठवी तू श्रीहरिचे, यमा कोठला मग थारा ॥ २०॥ पुन्हा जन्म नि मरण पुन्हा ते, नऊ मास जननी उदरी । हा भवसागर अतीच दुस्तर, वेड्या हरिचरणासी धरी ॥ २१॥ कवडी कवडी गोळा करुनी, खोपे केले वाळूंचे । पापपुण्य ना केली चिंता, बीज पेरले बाभळीचे ॥ २२॥ असे कोण तू, आला कोठुनि, किती जाहले माय पिता । शोधि उत्तरे अंतरात तू, नाटकापरी सर्व वृथा ॥ २३॥ मजमाझी नि तुजमाझीही चराचरहि विष्णुमय सारे । भेद ना करि सान थोर हा, समभावे जा शरण त्यास रे ॥ २४॥ शत्रुमित्र वा पुत्र बंधु ही ओळख विसरी अलगपणाची । पाही सकला निजरूपाने, नित्य प्रतीति अद्वैताची ॥ २५॥ क्रोध लोभ कामना मोह हे, सोड नि शोधी आत्मरुपाला । स्वबोध नसता अंधचि पुरता, अविरत भोगी तो नरकाला ॥ २६॥ वाच कधी तू गीता भागवत, ज्ञानेश्वरी नि कधी गाथा । नित्य आठवी हरिचरणाशी, सत्संगे हरि दीन व्यथा ॥ २७॥ भोग भोगिता, वाटे सुख परि, पुढच्या व्याधी साठविशी । अटळ मृत्यू तो निश्चित येई, दुश्चरणा कां आचरिशी ॥ २८॥ अर्थ असे तो अनर्थ नुसता, कधि न लाभते सौख्य तयाने । धनवंताला नित्य भय असे, स्वपुत्र फसविल कधी न जाणे ॥ २९॥ प्राणायाम नि प्रत्याहारे, नित्यानित्य विवेक विचारे । सत्य नि माया भेद यातला, शोधुनी स्मर त्या भगवंता रे ॥ ३०॥ श्रीगुरूच्या पदकमली आश्रय, सोड पाश हे संसाराचे । इंद्रिये नि मन नित्य संयमे, अनुभवी हृदयी सदन हरीचे ॥ ३१॥ नाद सोडी तू शास्त्र विधींचा, आचार्यांचा मार्ग अनुसरी । दिव्यत्वाला ओळख आपुल्या, नकोच गुंतू या संसारी ॥ ३२॥ भज गोविंदा, गोविंदा भज, वेड्या स्मर त्या गोविंदाला । इशस्मरणाविण अन्य मार्ग ना, जाया तरुनी भवाब्धिला ॥ ३३॥ चार दिसांचा असशी पाहुणा, इथले कांही तुझे नसे । हे माझे नि तेही माझे, मनात भरले तुझ्या पिसे ॥ दुर्मिळ जीवन वाया जाते, खेळी अडकला मायेच्या । नको मृगजळासाठी धावू, शरणी जा गोविंदाच्या ॥ जागृत होई, झडकरि वेड्या, जितुके क्षण तुझिया हाती । एक एक क्षण बहुमोलाचा, नको करू त्याची माती ॥ (aNNA) Posting on Mandiyali Google Group